
पूर्णा :
मराठवाड्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पूर्णा रेल्वे जंक्शनच्या नवीन इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट प्रकारे सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. समाजसेवक प्रदीप नन्नवरे यांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे थेट तक्रार दाखल करत यामागील गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
नवीन स्टेशनचे बांधकाम सुरू असताना, जुन्या स्टेशनमधील कालबाह्य मटेरियल – दगड, इत्यादी – वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे मटेरियल कमकुवत आणि अपुरे आहे, ज्यामुळे इमारतीचा दर्जा धोक्यात आला आहे. प्रदीप नन्नवरे यांचा सवाल आहे की, “जर जुन्याच मटेरियलमध्ये काम करायचं होतं, तर नवीन इमारत बांधायची गरज काय होती? आणि भविष्यात ही इमारत कोसळली, तर जबाबदार कोण?”
नन्नवरे यांनी आशंका व्यक्त केली की, संबंधित गुत्तेदार एवढं बिनधास्त आणि बोगस काम फक्त रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच करत आहे. त्यामुळे त्यांनी गुत्तेदाराचा करार रद्द करून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
पूर्णा रेल्वे स्थानक हे ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जात होते. रेल्वे विभागाच्या सुमारे दीडशे एकर जमिनीवर एकेकाळी अनेक महत्त्वाच्या कार्यालयांचे संचालन येथून होत असे. परंतु, आज या ऐतिहासिक वारशाचा अवमान होत असल्याचे चित्र आहे. नन्नवरे यांनी याप्रकरणी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटने लक्ष घालावे, आणि दर्जेदार बांधकामसाहित्य वापरूनच काम पूर्ण करावे, अशी ठाम मागणी केली आहे.
पूर्णा रेल्वे स्थानकाचे चालू बांधकाम म्हणजे सार्वजनिक पैशाचा अपमान असून, या प्रकरणात तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील दुर्घटनेसाठी प्रशासन आणि गुत्तेदार पूर्णपणे जबाबदार राहतील.