शहर

रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई :

रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी, रायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात हादगाव पाथरी येथे २० लोकांना मास्जिदीमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच माटेगाव येथे पूलावरुन पाणी जात असल्याने झीरो फाटा रस्ता सुरक्षास्तव बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण जवळ समुद्रात बोट पलटी झाली असता त्यामध्ये असणाऱ्या ८ जणांपैकी ५ व्यक्ती पोहत बाहेर आल्या असून ३ व्यक्तींचे कोस्ट गार्ड, स्थानिक प्रशासन व बचाव पथकांच्या मदतीने शोधकार्य चालू आहे.

तापोळा महाबळेश्वर रस्ता बंद

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सततच्या अतीवृष्टीमुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या असून भूस्खलनाच्या अनुषंगाने तापोळा महाबळेश्वर रस्ता सुरक्षास्तव बंद ठेवण्यात आला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : अपूर्ण विसर्जन सोहळा होणार पूर्ण; माघी गणेशोत्सव मंडळांना विसर्जनाची परवानगी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *