शिक्षण

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची १८ वेळा विजयी मोहर

मुंबई :

१९ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. ११ ते १५ मार्च २०२४ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहर उमटली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने स्पर्धेच्या १९ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल १८ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे. संगीत, नृत्य, नाट्य, वांड्मय आणि ललित कला या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने १११ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ६० गुण मिळाले आहेत. या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य एकल गायन, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, मूकाभिनय, मातीकाम, व्यंगचित्र या विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबत पाश्चिमात्य समूह गायन, लोकनाट्यवृंद, नाट्यसंगीत, नकला आणि प्रश्नमंजूषा या स्पर्धांमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तर भारतीय समुह गीत, शास्त्रीय नृत्य, एकांकिका, भित्तीपत्रके, रांगोळी आणि चित्रकला या स्पर्धांमध्ये कांस्य पदक मिळाले. पाच विभागापैकी नृत्य आणि नाट्य या विभागात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले आहे. कुमारी मोहक मटकर आणि सुधांशू सोमण या विद्यार्थ्यांनी विविध सहा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वात जास्त बक्षिस मिळवून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉयचा किताब मिळवला. विद्यापीठाच्या ४२ विद्यार्थ्यांच्या संघानी या सर्व कलाप्रकारात सहभाग घेतला होता.

या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील विजेते व माजी विद्यार्थी विजय जाधव, साहिल जोशी, अभिजीत मोहिते, रोहन कोतेकर, विलास रहाटे, केशर चोपडेकर, महेश कापरेकर, सागर चव्हाण, आशीष पवार, अमित घरत, अमन सिंह आणि अमोल बावकर या सर्वांचे सहकार्य लाभले असून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी यशस्वीरित्या या स्पर्धेचे नियोजन केले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी विजयी चमूचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *