आरोग्य

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ३० टक्के कर्मचारी निवडणूक ड्युटीवर

आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई :

निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या पाच वैद्यकीय महाविद्यालये व अन्य उपनगरीय रुग्णालयातील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर शीव, नायर, कूपर, केईएम आणि नायर दंत महाविद्यालयाबरोबर आरोग्य विभागातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्न वैद्यकीय कर्मचारी व तंत्रज्ञांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केईएम रुग्णालयातील जवळपास १३० कर्मचारी, शीव रुग्णालयातील जवळपास ११० कर्मचारी, नायर रुग्णालयातील जवळपास १०० कर्मचारी, कूपर रुग्णालयातील जवळपास ३० आणि नायर दंत महाविद्यालयातील जवळपास १०० कर्मचारी आणि आरोग्य विभागातील जवळपास २०० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना निवडणुकीच्या कामावर नियुक्ती केल्याने रुग्णांना रक्ताचे, सीटी स्कॅन, एमआरआयचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. तसेच परिचारिकांची नियुक्ती केल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सुट्टीचे अर्ज, सेवानिवृत्तीची काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर पाठविणे अनिवार्य आहे. परंतु आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर पाठवताना सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही व रुग्णांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *