शहर

अभिनेता जीतेंद्र यांनी मुंबईकरांना केले मतदान करण्याचे आवाहन

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात अभिनेता जीतेंद्र व अभिनेता तुषार कपूर यांचा मोलाचा सहभाग

मुंबई :

“मुंबईकरांनी आणि देशातील सर्व नागरिकांनी आपापले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, नाव नसेल तर नोंदणी करावी. येत्या निवडणुकीत मतदान अवश्य करावे”, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेता जीतेंद्र यांनी केले. त्याचबरोबर आपण प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो, हे देखील जीतेंद्र यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात आवर्जून नमूद केले आहे.

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४’ साठी मुंबईमध्ये येत्या दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईमध्ये मतदार जनजागृती विषयक उपक्रमांनी वेग घेतला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्तिमत्वांची भेट निवडणूक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत घेण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई शहर व उपनगराचे ‘निवडणूक ‘स्वीप’ कार्यक्रम’ समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी आणि जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी अभिनेता जीतेंद्र व अभिनेता तुषार कपूर यांच्या जुहू येथील निवासस्थानी जाऊन त्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबाने मतदान करावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले पत्र जीतेंद्र आणि त्यांचे पुत्र तुषार कपूर यांना देण्यात आले. त्याचबरोबर जीतेंद्र यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे, अशी विनंती देखील ‘स्वीप’ चमूद्वारे सदर भेटीदरम्यान करण्यात आली होती. या विनंतीला मान देत अभिनेता जीतेंद्र यांनी त्यांचे आवाहन असलेला व्हिडिओ संदेश नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय पाठवला आहे.

मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत भेट घेण्यास गेलेल्या ‘स्वीप’ चमूचे अभिनेता जीतेंद्र यांनी आस्थेने स्वागत केले. या भेटीदरम्यान संवाद साधताना जीतेंद्र यांनी त्यांच्या गिरगावातल्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेता जीतेंद्र यांची भेट व्हावी, यासाठी पश्चिम विभागाचे अपर पोलिस आयुक्त परमजित सिंह दहिया आणि परिमंडळ नऊचे पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांचे सहकार्य मिळाले, अशीही माहिती या निमित्ताने डॉ. सुभाष दळवी यांनी दिली आहे. त्याचबरोबर अभिनेता जीतेंद्र यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचे विशेष आभार देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मानले आहेत.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयांद्वारे कळविण्यात आले आहे की, मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अथवा Voter Helpline Mobile App किंवा मतदार मदत क्रमांक १८००-२२-१९५० यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांनी पुन्हा केले आहे.

अभिनेता जीतेंद्र यांच्या आवाहनातील ठळक मुद्दे

  • आपल्या प्रभावी आणि सुस्पष्ट आवाजात मतदारांना आवाहन करताना अभिनेता जीतेंद्र म्हणाले की, मी मुंबईतील आणि देशातील मतदारांना आवाहन करतो की, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा उपयोग करून मतदारांनी मतदान करून आपले अमूल्य मत द्यावे.
  • मत देऊन देशाप्रती असणारी आपले कर्तव्य आवर्जून पार पाडा.
  • मतदार यादीत आपले नाव आहे का, याची खातरजमा करुन घ्यावी.
  • आपले नाव मतदारयादीत नसेल, तर लगेच नोंदणी करावी.
  • येणाऱ्या निवडणुकीत मतदान करून आपले अमूल्य मत देऊन देशासाठी आपली जबाबदारी पार पाडा.
  • मी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो, आपणही मतदान करा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *