मुंबई :
मुंबईत काही महिन्यात शिक्षक आमदारकीची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवनाथ दराडे मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीत शिक्षक आमदार झाल्यास मुंबईतील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. झाला तरी तो मुंबईच्या बाहेर कधीच जाणार नाही असे आश्वासन दराडे यांनी मुंबईतील शिक्षकांच्या बैठकीत दिले.
मुंबईतील रात्रशाळेतील संतोष धावडे, पांडुरंग राठोड, मनाली पाटणकर, राजेश तिवारी यांनी रात्रशाळेत १७ मार्च रोजी मुख्याध्यापकांची सभा आयोजित केली होती. या सभेस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह राजकुमार बोनकीले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, संघटन मंत्री किरण भाव ठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष सुहास हिर्लेकर व कार्यवाह मुंबई विभाग शिवनाथ दराडे आदी सभेस उपस्थित होते. मुख्याध्यापक सभेत मार्गदर्शन करताना शिवनाथ दराडे यांच्या वतीने सांगण्यात आले की, मुंबईतील मराठी शाळा व रात्र शाळा वाचवायच्या असतील तर संच मान्यतेचा जाचक शासन निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार व रात्र शाळेतील गोर गरीब, कष्टकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण कायम सुरु राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार, असे आश्वासन मुंबईतील शिक्षकांना देण्यात आले.
शासन निर्णय १७ मे २०१७ ते शासन निर्णय ३० जून २०२२ मधील रात्र शाळेतील एकाच ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ शिक्षकाचे लाभ किंवा त्यांना दिवसा अन्य शाळेत समायोजन करता येईल का? याची पडताळणी करून यादृष्टीने सुद्धा शिक्षक परिषदेकडून प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन दराडे यांच्यावतीने देण्यात आले.
मुंबईतील शिक्षक आमदार हा मुंबईतीलच शिक्षक असावा हीच भावना मुंबईतील शिक्षकांची आहे. मुंबईतील महिला शिक्षिका यांच्यासाठी त्यांच्या शाळेत हिरकणी कक्ष स्थापना केली जाईल. महिलांना शाळेत सुरक्षितता मिळावी यासाठी महिला बाल कल्याण विभागामार्फत व शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत ‘महिला शिक्षिका सुरक्षा समिती’ची स्थापना भविष्यात केली जाईल, असेही शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने सांगण्यात आले. संपूर्ण मुंबईत मुंबईचा शिक्षक आमदार शिवनाथ दराडे यांच्याच नावाची सध्या चर्चा व मागणी जोर धरू लागली आहे असे सध्याचे चित्र दिसत आहे, असे मुंबई जिल्हा अध्यक्ष सुहास हिर्लेकर यांच्या वतीने सांगण्यात आले.