मुंबई :
देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधिल ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदी यांनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा देशाचा अपमान असून जनता येत्या निवडणूकीत त्याचे उत्तर देईल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पक्ष कार्यकारीणीची बैठक वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
औरंगजेबाने आपल्या वडिलांना सोडलं नाही भावांनी सोडले नाही, नातेवाईकांना सोडले नाही. औरंग्याची ही वृत्ती कुणाची आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मोदी यांच्यावर केलेल्या या टीकेचा सूड महाराष्ट्रातील जनता नक्की घेईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून देईल असे मत व्यक्त केले. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मणिपूरबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेपूट घातल्याची टीका केली होती, याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून दाखवले होते. त्याना शेपूट घातली म्हणणं ही काही मर्दुमकी नाही या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. हे फोटोग्राफर असल्याने शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढून काढून याना शेपटीबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाणारे, दिल्लीपुढे लोटांगण घालणारे, आणि नोटीस आल्यावर घाम फुटणारे, म्हणजे खरे शेपूट घालणारे कोण आहेत..? ते उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मुख्यमंत्रीपदासाठी, खुर्चीसाठी आपल्या विचारांना तिलांजली देऊन कुणी शेपूट घातलेलेही उभ्या महाराष्ट्राने पाहिले असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल विचारले असता, राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र अजूनही चर्चा सुरू राहील त्याबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्ष कार्यकरणीत ४५ हुन अधिक जागा जिंकण्याची रणनीती तयार
शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणी बैठकीला पक्षाचे राज्यभरातील सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, सचिव, प्रवक्ते, स्टार प्रचारक, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, मतदारसंघातील निरीक्षक, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठीचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यासाठीच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच लोकसभा निवडणूकित ४५ हुन अधिक जागा जिंकण्याबाबतची रणनीती निश्चित करण्यात आली.