आरोग्य

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यातील खासगी रुग्णालयात होणार मोफत शस्त्रक्रिया

मुंबई :

खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या अनेक लहान मुलांवर पैशाअभावी शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने राज्यातील बालकांवर खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार व्हावेत यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यातील दुय्यम आणि तृतीय श्रेणीतील नऊ खासगी रुग्णालयांसोबत करार केला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या बालकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुले उपचारासाठी येत असतात. मात्र आर्थिकदृष्ट्या ,कमकुवत असलेल्या या रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसतात. परिणामी त्यांना शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यातील नऊ खासगी रुग्णालयांसोबत करार केला आहे. या करारानुसार या रुग्णालयांमध्ये लहान मुलांमध्ये जन्मजात असलेले हृदयरोग, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, सुघटनशल्य शस्त्रक्रिया, मज्जातंतू शस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ, दंत, कान – नाक – घसा आणि नेत्ररोग शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मॉडेल कास्टिंगद्वारे ठरविण्यात आलेल्या रकमेनुसार देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रियेचा भार हा खासगी रुग्णालयांवर पडणार नसल्याने खासगी रुग्णालयांमधील लहान मुलांवर मोफत उपचार होण्यास मदत होणार आहे. या करारानंतर या नऊही रुग्णांना त्यांच्याकडे प्रतीक्षा यादीत असलेल्या लहान मुलांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. संतोष माने यांनी दिले आहेत.

या रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार

  • लोट्स हॉस्पीटल ॲंड क्रिटिकल केअर, नांदेड
  • रेडियंट प्लस रुग्णालय, नाशिक
  • डीआरएम होप रुग्णालय, नागपूर
  • स्वास्थम सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर
  • महात्मा गांधी मिशन दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नवी मुंबई
  • गजानन महाराज ग्रामीण रुग्णालय, कोल्हापूर
  • ज्युपिटर लाईफलाईन रुग्णालय, पुणे
  • टियेटन मेडिसिय, ठाणे
  • एमजीएम नवी मुंबई रुग्णालय, वाशी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *