शहर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे

इंदापूर :

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. आज २०२४ वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही. सरकारने कांदा निर्यातंबदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला. कापूस उत्पादक हवालदिल झाला. पण सरकारला त्याची काहीच काळजी नाही. प्रधानमंत्र्यांवर टीका केली, म्हणून दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत. आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवले. उद्या तुम्ही विरोधात भूमिका घेतली, तर तुमचेही खाते बंद करतील. आघाडीचे उमेदवार निवडून आणणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती ९८ टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे. असे शरद पवार म्हणताच, साहेब एक नंबरला नाव आहे असा आवाज गर्दीतून आला. चला एक नंबर तर एक नंबर. मला नंबर माहिती नाही. माझा नंबर खालून असायचा. असो, पण काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आज आपलं चिन्ह बदललं तुतारी लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा, असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरकरांना केले.

शरद पवार म्हणाले की, आपण साखर निर्यात करतो. त्यातून दोन पैसे जास्त मिळतात. पण, केंद्राने सांगितलं की तुम्हाला साखर निर्यात करायची असेल तर आम्ही निर्यातीवर कर आणि जीएसटी लावू. त्याचा परिणाम असा झाला की आज कारखान्यात साखरेचे पोते पडून आहेत. यावर तोडगा म्हणून पंतप्रधानांनी इथेनॉल करायला सांगितले. कारखान्यांनी तयारही केले नंतर मात्र बंधन घातले. याचा मोठा फटका कारखान्यांना बसला यावरून दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आता चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला करा असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहेत. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला. आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. केजरीवाल चमत्कारिक मुख्यमंत्री. त्यांनी लोकांसाठी अनेक चांगली कामे केली. आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत कशासाठी तर पंतप्रधानांवर टीका केली म्हणून. दिल्लीत केजरीवाल अतिशय लोकप्रिय आहेत. आज तेच तुरुंगात आहेत. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. आज संकटाचं चित्र देशात दिसत आहे. हे चित्र बदलायचं आहे. यासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची आहे.

शरद पवार म्हणाले की, दिल्लीत शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले. पण मोदी सरकार त्यांच्याकडे पहायलाही तयार नाही. काँग्रेसचे बँक खाते सुद्धा या लोकांनी गोठवले. व्यवहार बंद केला. उद्या तुमचंही खातं ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. यासाठी या लोकांचा पराभव करा. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार साहेब यांनी केले.

इंदापूरमध्ये जोरदार तुतारी वाजेल ही माझी गॅरंटी- सुप्रिया सुळे

यंदाच्या निवडणुकीत इंदापूरात जोरदार तुतारी वाजणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. सहा महिन्यांपूर्वीच आपला घटस्फोट झाला आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण आपण एकाच ताटात जेवत होतो. मलिद्यात मी वाटेकरी नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते. माझ्यावर आरोप करायचा असेल तर मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही पण या म्हणाल त्या विषयावर चर्चा करू असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सध्या दमदाटी केली जात आहे. पवारांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण यंदा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दरम्यान, रोहित पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला. ते लोकशाही पद्धतीने शांततेने प्रचार करत आहेत. मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर माझ्यावरही टीका झाली. कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही? टीका करताना पातळी सोडली जात आहे. हे काय संस्कार आहेत का?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील केंद्र सरकार शेतकरी विरोधात आहे. चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे तुमचे हक्काचे ३०० रुपये या केंद्र सरकारमुळे गेले. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील ४८ जागा लढणार, आणि सर्व निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. इंदापूरचा लाल दिवा भाजप सरकारने काढून घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *