मुंबई :
मुंबईच्या जडणघडणीत आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पारशी समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पारशी समाजाच्या अवेस्ता पहलवी या ऱ्हास पावत चाललेल्या भाषेच्या संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये अवेस्ता पहलवी अभ्यासक्रम सुरू करत प्रमाणपत्र, पदविका, पदवी व डॉक्टरेट करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या भाषेचे शिलालेख, जुने कागदपत्रांचे दस्ताऐवजीकरण करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
पारशी झोरायस्टीन समाजाची अवेस्ता पहलवी या भाषेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. पारशी समाजाने मुंबईच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही पारशी समाजाची महत्त्वाची भूमिका आहे. ही बाब लक्षात घेता पारशी समाजाची अवेस्ता पहलवी या भाषेचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी मुंबई विद्यापीठाने घेतली आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाला केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीद्वारे अवेस्ता पहलवी भाषेचे जुने शिलालेख, जुनी कागदपत्रे यांचे दस्ताऐवजीकरण करून ते मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या भाषेचा अभ्यास महाराष्ट्रासह देशविदेशातील विद्यार्थ्यांना करणे शक्य व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये अवेस्ता पहलवी हा भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी व डॉक्टरेट करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डाॅ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
भाषेचा ऱ्हास हा संस्कृतीचा ऱ्हास समजला जातो. त्यामुळे पारशी संस्कृतीचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अवेस्ता पहलवी या भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी झोरायस्टीन संस्कृतीचा अन्य संस्कृतीसोबत असलेले संबंध आणि अवेस्ता पहलवी या भाषेचे संस्कृत आणि पर्शिया भाषेमध्ये असलेले साम्य तपासण्यात येणार आहे. अवेस्ता पहलवी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी इमारत उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून २० कोटींचा अतिरिक्त निधीही देण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.