शहर

नवमतदारांना २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आणि ॲपद्वारेही सुविधा उपलब्ध

मुंबई : 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवमतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲपद्वारे १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना नाव नोंदवता येणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा कार्यालयांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमा (स्वीप) अंतर्गत या कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील चारही मतदारसंघात केले जात आहे. यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून डॉ. सुभाष दळवी हे काम पाहत आहेत. त्यांच्या समन्वयना खाली विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन होत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून चारही मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

लोकशाही अधिक सक्षम होण्यासाठी युवकांचा मतदानात जास्तीत जास्त सहभाग वाढणे गरजेचे आहे. मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ या वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार असून, नव मतदारांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २४ एप्रिल, २०२४ पर्यंत त्यांना ऑनलाईन पद्धतीने अथवा ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येणार आहे. अठरा वर्ष पूर्ण केलेल्या युवकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय आणि स्वीप कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *