मुंबई :
वंधत्वामुळे त्रस्त पालकांना मोफत किंवा स्वस्तामध्ये उपचार मिळावेत आणि त्यांची माता-पिता होण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी कामा रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला (आयव्हीएफ) वंधत्व जोडप्यांचा प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या आठवडाभरामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी पालघर व रायगडमधील ३० जोडप्यांनी कृत्रिम गर्भधारणेसाठी नोंदणी केली आहे. यापैकी काही जणांवर उपचार सुरू केले असून, अन्य जोडप्यांवर लवकरच उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
विवाहानंतर अनेक वर्षांनंतरही काही जोडप्यांना माता-पिता होण्याचे भाग्य लाभत नाही, अशा जोडप्यांसाठी वरदान ठरत असलेले कृत्रिम गर्भधारणा केंद्र नुकतेच राज्य सरकारच्या महिला व प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा रुग्णालयात सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या जोडप्यांच्या नोंदणी प्रक्रियेला आठवडाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली. ही नोंदणी सुरू झाल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी व रायगडमधील वंधत्वाने त्रस्त असलेल्या तब्बल ३० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. यातील पाच ते सहा जोडप्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित जोडप्यांवर लवकरच उपचार सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कामा रुग्णालयातील कृत्रिम गर्भधारणा केंद्राला वंधत्वाने त्रस्त असलेल्या जोडप्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. नाेंदणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर, रायगड यासह काही ग्रामीण भागातील जोडप्यांचाही समावेश आहे. कृत्रिम गर्भधारणा उपचार हे महागडे असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे कामा रुग्णालयातील केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेले कृत्रिम गर्भधारणा केंद्र हे प्रथमच कामा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. वंधत्त्व असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय जोडप्यांना याचा मोठा आधार झाला आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या आशेने येत आहेत. त्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू
– डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय