आरोग्य

हाफकिनची उत्तुंग भरारी;  १६ औषधांचे उत्पादन करण्याची मिळाली परवानगी

आता हाफकिन २५ पेक्षा जास्त औषधांची निर्मिती करणार आहे.

मुंबई :

हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाकडून बनविण्यात येणाऱ्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे. त्यामुळेच २०२३ मध्ये हाफकिनने २०४ कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली. त्यामुळेच आता हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे आता हाफकिन २५ पेक्षा जास्त औषधांची निर्मिती करणार आहे.

हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळामार्फत बनविण्यात येणाऱ्या सर्वच औषधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. हाफकिनच्या संर्पदंशावरील लशीला श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूटान, नेपाळ या शेजारील देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. तर पोलिओवरील लसीला जगातील ४५ देशातून मागणी आहे. त्यामुळेच २०२३ मध्ये हाफकिनने पोलिओ लसीच्या १ कोटी ३० लाख ८३ हजार ५३८ मात्रा तयार केल्या. त्याखालोखाल सर्पदंशाच्या लशीच्या १ लाख ६४ हजार ७२८, विंचूदंशाच्या लशीच्या ६ हजार ८३३ मात्रा तयार केल्या. खोकल्यावरील कॉफेकिन औषधाच्या दोन लाख बाटल्या, तर तापावरील पॅराकिन औषधाच्या १ लाख ३० हजार ७९ बाटल्या आणि तर प्रतिजैविक औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अझिथ्रोमायसिनच्या ४१ लाख ७२ हजार ३३० गोळ्यांची निर्मिती केली. यातून जवळपास २०४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल हाफकिन महामंडळाने केली. देशाला परकीय चलन मिळवून दिल्याबद्दल २०२२ मध्ये हाफकिनला राज्य सरकारचा उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारही मिळाला आहे. या बाबी लक्षात घेता राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या औषधांच्या निर्मितीला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. यामुळे हाफकिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

औषधांची निर्मिती करताना त्याचे दर स्पर्धात्मक असावे, हे दर राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणच्या दरांशी सुसंगत असावे. उत्पादन क्षमतेच्या २० ते २५ टक्के उत्पादन खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्य सरकारकडून दिले असल्याची माहित हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापक एस. शंकरवार यांनी दिली.

हाफकिन निर्मिती करत असलेली औषधे

सर्पदंश, विचूदंश, पोलिओ लस, ताप, खोकल्याच्या औषधांबरोबरच रक्त पातळ करण्यासाठी असलेली ॲट्रोव्हॅस्टा, संधिवातासाठी असलेली डायक्लोफेनाक सोडियम, कांजण्या, नागिण यासारख्या संसर्गजन्य आजारांसाठी ॲसिक्लोव्हिर, मधुमेहाला प्रतिबंध करणारे मेटफॉर्मिन, स्किझोफ्रेनियावरील ओलान्झापाइन, पित्तावरील पॅण्टोप्राझोल आणि काही प्रतिजैविक असलेल्या औषधांची हाफकिनकडून निर्मिती करण्यात येते.

हाफकिनला निर्मितीसाठी मान्यता मिळाली औषधे

  • ॲण्टासिड सस्पेशन १७० मिली
  • टॅब्लेट पॅरासिटेमॉल ५०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट पॅरासिटेमॉल ६५० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट आयब्युप्रोफेन ४०० मिलिग्रॅम
  • सिरप आयब्युप्रोफेन ६० मिली
  • टॅब्लेट अझिथ्रोमायसिन ५०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट मेट्रोनायडेझोल २०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट मेट्रोनायडेझोल ४०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट फुरोझॉलिडॉन १०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट कॅल्शियम विथ व्हिटामिन ॲण्ड मिनरल
  • सिरप कॅल्शियम विथ व्हिटामिन ॲण्ड मिनरल
  • टॅब्लेट व्हिटामिन बी
  • सिरप व्हिटामिन बी
  • टॅब्लेट ॲस्कॉरबिक ॲसिड ५०० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट टेलमिसरटन ४० मिलिग्रॅम
  • टॅब्लेट सिटाग्लिप्टीन १०० मिलिग्रॅम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *