शहर

पवई तलाव २३ टक्के जलपर्णी मुक्त

आतापर्यंत काढली ५ हजार ८९५ मेट्रिक टन जलपर्णी

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्न अंतर्गत, तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ८ मार्च २०२४ पासून सुरू आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून १६ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत ५ हजार ८९५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे २९ एकर क्षेत्र जलपर्णी मुक्त झाले आहे. जलपर्णी व्याप्त क्षेत्रापैकी सुमारे २३ टक्के क्षेत्र जलपर्णी मुक्त झाले आहे. पवई तलावाची नैसर्गिक समृद्धी वाढीस लागण्यासह तलावाच्या जैवविविधतेचे संरक्षण होण्यास देखील याद्वारे मदत मिळणार आहे.

पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पवई तलाव आणि परिसराला भेट देऊन या उपाययोजनांची पाहणी देखील केली होती. विशेषत्वाने तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीला वेग देण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही कामे सुरू आहेत.

पवई तलाव हा १८९१ मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर २२३ हेक्टर इतका आहे. जवळपास ६.६ किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टर वर पसरलेले असून तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त (non-potable) इतर प्रयोजनांसाठी उपयोगात येते.

पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झालेली आहे. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होऊन तलावातील माशांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ खुंटते आणि अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. पाण्याची गुणवत्ता देखील खालावते. या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई तलाव आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची जी विविध कामे सुरू केली आहेत, त्यामध्ये तलावातील जलपर्णी काढणे आणि क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावणे, ही एक महत्त्वाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामांसाठी ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला. दुसऱ्या दिवसापासून म्हणजे ८ मार्च २०२४ पासून या कामांना सुरुवात करण्यात आली. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. या कंत्राटाचा एकूण कालावधी २ वर्षांचा आहे. यामध्ये, सध्या अस्तित्वात असलेली जलपर्णी काढण्याचा कालावधी ६ महिने इतका असून त्यानंतर परिरक्षणाचा कालावधी १८ महिने म्हणजे दीड वर्ष इतका समाविष्ट आहे. तलावाच्या ५५७.५० एकर जलव्याप्त क्षेत्रापैकी जलपर्णी व्याप्त क्षेत्र हे सुमारे १२३.९७ एकर इतके होते. त्यापैकी २९.२५ एकर क्षेत्रावरून जलपर्णी काढण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे २३.५९ टक्केक्षेत्र जलपर्णी मुक्त झाले आहे. उर्वरित क्षेत्र ९४.७२ एकरावरील जलपर्णी काढण्याची कामे देखील वेगाने केली जात आहे.

कंत्राटदाराला दिलेल्या कार्यादेशाप्रमाणे एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, १६ एप्रिल २०२४ पर्यंत सुमारे ५ हजार ८९५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेण्यात आली आहे. याचाच अर्थ आणखी १९ हजार ०९० मेट्रिक टन जलपर्णी सध्याच्या कंत्राटदाराकडून काढली जाणे अपेक्षित आहे.

दरम्यान, पवई तलावाचे नैसर्गिक संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. ही बाब लक्षात घेवून, पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक उपाययोजना करण्यात येत आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या मलनिसारण प्रकल्प खात्याच्या वतीने नुकतीच पाहणी करण्यात आली आणि त्यानुसार कामे हाती घेण्यात येत आहेत. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगते कारंजे व्यवस्था यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तलावातील जैवविविधता आणि जलचरांच्या हिताच्या दृष्टीने पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी देखील Aeration and Dissolved Oxygen (DO) Monitoring System पवई तलावाच्या ठिकाणी नुकतीच उभारण्यात आली आहे. त्यातून सातत्याने प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जात आहे. सांडपाण्याच्या प्रवाहामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले, ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था (Maharashtra Engineering Research Institute) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहकार्याने पवई तलावातील गाळ विषयक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर विश्लेषण करून भविष्यात पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यात येणार आहे. एकूणच, पवई तलावातील प्रदूषणाची समस्या रोखून तलावाचे पाणी शुद्ध राखणे, तलावाची नैसर्गिक स्थिती आणि त्यातील जैवसमृद्धी टिकविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *