मुंबई :
मागील काही दिवसांपासू मुंबईमध्ये वाढत असलेल्या उकाड्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे. नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर येणे, अतिसार, उलट्या येणे असे आजार नागरिकांमध्ये वाढू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे हे आजार वाढत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेला घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
मुंबईतील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी किंवा उन्हामध्ये बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील १० दिवसांमध्ये अतिसार व उलटीचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. घरातून बाहेर पडताना सोबत पाणी घेऊन बाहेर न पडणारे नागरिक तहान लागल्यावर कोठेही पाणी पितात किंवा लिंबू पाणी, ज्यूस पितात. मात्र त्यासाठी वापरण्यात येणारे पाणी ही आरोग्याच्यादृष्टीने अपायकारक असल्याने नागरिकांना अतिसार व उलटीचा त्रास होत असल्याचे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले. तसेच सकाळी धावण्यास जाणाऱ्या तरुणांकडून स्वत:कडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या शरीरातील निर्जलीकरण होऊन त्यांना त्रास होत असलेली रुग्ण वाढू लागले आहेत. तर भर उन्हामध्ये पोलीस भरतीचा सराव करताना वाढत्या उष्णतेमुळे एका तरुणाला ‘सेरेब्रल व्हिनस सायनस थ्रोम्बॉयसिस’चा झटका आल्याचा रुग्ण काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला असल्याची माहिती डॉ. जगियासी यांनी दिली.
वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर काही दिवसांपासून दिसू लागला आहे. उलटी, अतिसार, थकवा येणे आणि चक्कर येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १० दिवसांपासून यामध्ये वाढ झाली असून, दररोज साधारण १० ते १२ रुग्ण येऊ लागले आहेत. या रुग्णांना दुपारच्या वेळेत घरातून बाहेर न पडण्याचा तसेच बाहेरील पाणी व खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला डॉ. सुचित्रा वराळे यांनी दिला.
लहान मुलांनाही होतोय त्रास
लहान मुले ही दिवसभर उन्हामध्ये खेळत असल्याने त्यांना निर्जलीकरणाबरोबरच उष्माघाताचा सौम्य त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांना जुलब व उलट्यांचा त्रास होत असून मागील काही दिवसांपासून दररोज सहा ते सात रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिली. लहान मुलांना दुपारचे घराबाहेर सोडू नये, त्यांना दिवसाला किमान दोन लिटर पाणी द्यावे. पाणीदार फळे त्यांना खायाला द्यावीत, शाळेमध्ये पाठवताना टाय व कमरेचा पट्टा लावू नये असा सल्लाही त्यांनी दिला.