शहर

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात – शरद पवार

ही निवडणूक देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

निपाणी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उद्ध्वस्त करणार आहेत. ही निवडणूक देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि भारताचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. या निवडणुकीकडे जगाचं लक्ष आहे. भारत हा लोकशाहीचा देश आहे. आपल्या आजूबाजूचे देश बघितले, पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही असते, तर कधी लष्कराची हुकूमशाही असते. श्रीलंकेमध्ये मध्यंतरी हुकूमशाही होती. बांग्लादेशमध्ये लोकशाही आहे, एक काळ असा होता की तिथं लष्कराचं राज्य होतं. पण भारत हा देश असा आहे की इथे फक्त लोकांचं राज्य होतं, लोकशाही होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सर्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश चालवायला लोकशाहीची पद्धती याबद्दल कधी तडजोड केली नाही. त्यामुळे हा देश लोकशाहीच्या मार्गावर गेला. लोकशाहीची परीक्षा या निवडणुकीमध्ये आहे. असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित असलेल्या तुमचं स्वागत करायला मला मनापासून आनंद होत आहे. देशाचं सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा आणि गेली ५ -१० वर्षं ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घ्यायच्या दृष्टीने ही निवडणूकआधीची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात होते, आजही आहे. चांगली गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावं लागतंय. स्थिती कशामुळे झाली? तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम आखलाय, तो गमतीचा आहे. तामिळनाडूमध्ये ४२ जागा आहेत. त्या जागांची निवडणूक एका दिवसात झाली. उत्तरप्रदेशमध्ये त्याहीपेक्षा जास्त जागा आहेत. त्यांची निवडणूक दोन दिवसांमध्ये. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत, त्याची निवडणूक पाच दिवसांमध्ये होणार आहे. कशासाठी? जर कर्नाटकची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते, तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? ती होऊ शकत नाही, त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्या यंत्रणेचा अहवाल आला असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण, पर्याय काय? त्यांनी मग हा पर्याय शोधला की महाराष्ट्राची निवडणूक चार-पाच टप्प्यात घ्यायची. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं. खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मत मिळवायचं हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सागितले.

शरद पवार म्हणाले की, मोदी २०१४ साली पहिल्यांदा आले. त्यावेळी त्यांनी सगळ्या सभांमधून सांगितले की मनमोहन सिंगांच्या राज्यात महागाई प्रचंड वाढली. मोदींनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता आल्यानंतर ५० दिवसांत पेट्रोलचा दर खाली आणतो. ५० दिवस काय तर आज ३६५० दिवस झाले मोदींनी हे आश्वासन देऊन आणि ३६५० नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली. १०६ रुपये लीटर. मोदींनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही ४१० होता, आणखीन खाली आणणार. तोच सिलिंडर गॅस आज अकराशे साठ रुपये झाला. चुकीच्या, खोट्या गोष्टी सांगायच्या. खोटी आश्वासनं द्यायची. या देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. मोदींनी सांगितलं की आमची सत्ता आली की एका वर्षांत दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ. दहा वर्षं होऊन गेली, जगात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संघटना आहे. ती जगातल्या नोकरींच्या संधी संदर्भात अभ्यास करते. त्यांचा अहवाल नुकताच आलाय. त्यात म्हटलंय की भारतात १०० तरूण शिकून बाहेर पडले, तर त्यातल्या ८७ तरुणांना नोकरी मिळत नाही. दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणारे मोदी आज शंभरातल्या ८७ तरुणांना नोकरी देऊ शकत नाहीत. या तरुणांची फसगत करण्याची भूमिका त्यांनी घेतली..

शरद पवार म्हणाले की, या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या आत्महत्यांचं कारण त्यांच्या घामाची किंमत त्यांना मिळत नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही पण मोदी या सगळ्यांकडे ढुंकून बघायला तयार नाहीत. असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *