शिक्षण

मुंबई विद्यापीठात एम. टेक इन नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी दुहेरी पदवीचे शिक्षण

अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी) विभागात या शैक्षणिक वर्षापासून एम.टेक इन नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या विषयातील दुहेरी पदवी मिळणार आहे. या दुहेरी पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडियाना विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे. एम. टेक इन नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या विषयातील दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण इंडियाना विद्यापीठात घेता येईल, त्याचबरोबर तेथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण घेता येईल. विशेष म्हणजे इंडियाना विद्यापीठात पी.एचडी. आणि पोस्ट डॉक्टरेट करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या दुहेरी पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे. नुकतेच इंडियाना विद्यापीठातील इंटिग्रेटेड नॅनोसिस्टमस् डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूटचे संचालक प्रा. मंगीलाल अगरवाल यांनी मुंबई विद्यापीठास भेट देऊन या आंतरराष्ट्रीय साहचर्याबाबत चर्चा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील, नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील, विभागातील इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मंगीलाल अगरवाल यांनी याप्रसंगी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नोलॉजी) विभाग आणि इंडियाना विद्यापीठ या दोन्ही उच्च शिक्षण संस्थामध्ये झालेल्या कराराअंतर्गत विद्यार्थी विनिमयामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधन पद्धती आणि प्रगत उपकरणांचा अभ्यास करता येईल. तसेच प्रयोगशाळेतील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे नमुना तपासणीसाठी मोठे सहाय्य मिळणार आहे. दोन्ही विद्यापीठातील संशोधकांना संयुक्त आणि सहयोगी प्रकल्पांवर एकत्रित काम करता येईल. त्याचबरोबर संशोधन सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकतील. या सहयोगी कार्यक्रमामुळे संशोधन प्रकाशने आणि संयुक्त प्रकाशनावरही काम करण्याची संधी मिळू शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच एम. टेक या दुहेरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून सेमी कंडक्टर क्षेत्रातील संशोधनासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारणीसाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *