शहर

वादळी वारा आणि पावसामुळे पालिकेच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; एल व एस विभागात होणारा पाणीपुरवठा बंद

मुंबई : 

वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवार (दिनांक १३ मे २०२४) सायंकाळी ५ वाजता पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले आहे. पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये सोमवारी सायंकाळी (दिनांक १३ मे २०२४) झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पवई येथील २२ केव्ही उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे. अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अंधारात दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे.

एस विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कंपाउंड, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग,वाडिया इस्टेट, एम. एन रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एल.बी.एस.कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स,सुंदरबाग,शिव टेकडी संजय नगर,कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल. बी. एस रोड, चाफे गल्ली, चूनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर दुरुस्ती झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय क्रंमांक कप्पा क्रमांक २ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे. मुंबईकर नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया सदर कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *