आरोग्य

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या काळजीसाठी काम करणार – डॉ. सुवर्णा खाडिलकर

मुंबई प्रसूती स्त्रीरोग संस्थेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुवर्णा खाडिलकर यांनी संपूर्ण ताकदीने कामाला सुरूवात केली

मुंबई :

पौगंडावस्थेपासून वृद्धत्वापर्यंतच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांची काळजी घेणे, त्यांचे आरोग्य बळकट करण्यासाठी, त्यांना आधार देणे या थीमवर वर्षभर काम करण्याचा निर्धार मुंबई प्रसूती स्त्रीरोग संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा खाडिलकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी १६ कलमी अजेंडा तयार केला असून, विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी विविध समित्यांही स्थापन केल्या आहेत.

मुंबई प्रसूती स्त्रीरोग संस्थेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुवर्णा खाडिलकर यांनी संपूर्ण ताकदीने कामाला सुरूवात केली आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेच्या सदस्यांसाठी वैद्यकीय शिक्षण सुरू करणे आणि विविध क्षेत्रातील तरुण स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी प्रथमच विशेष प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देत मुंबई ओबीजीएन सोसायटीच्या माध्यमातून पुस्तके व प्रकाशने प्रकाशित करण्यास सुरू केली, यासाठी समविचारी संस्थांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मुंबई प्रसूती स्त्रीरोग संस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी संस्थेच्या घटनेत दुरूस्ती करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

गरीब रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांनी अधिकाधिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याबराेबरच गाव दत्तक कार्यक्रम हाती घेतला आहे. ९ मे रोजी पालघरच्या मसवन येथे भरविलेल्या भव्य आरोग्य शिबिरात २८ गावातील नागरिकांची तसेच २०० अतिजोखमीच्या रूग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये ॲनिमिया, कॅन्सर, ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रिया आणि उच्च जोखमीची गर्भधारणा तपासणी केली. गंभीर ॲनिमिया असलेल्या रुग्णांना इंजेक्शन्स आणि गोळ्यांचे वाटप केले. हे आरोग्य शिबिर पालघर येथील डॉ. राजेंद्र चौहान यांनी डॉ. अलिफिया अन्सारी यांच्या माध्यमातून आणि कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे त्यांच्या टीमने सहाय्याने आयोजित केले होते.

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पाच मोठ्या परिषदांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ सहभागी होणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. गरीब आणि गरजूंसाठी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात धर्मादाय उपक्रमांची योजना आखली आहे. संस्थेच्या सदस्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांनी फिटनेस प्रोग्राम तयार केला आहे. प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्याही समजून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *