मुंबई :
दुधाच्या चहाच्या जास्त सेवनाने रक्तदाब वाढण्याबरोबरच हृदयात अनियमितता येते. तसेच सततच्या सेवनाने लोहाची कमतरता आणि अशक्तपणा सारखी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे दुधाचा चहा टाळण्यात यावा, असे आयसीएमआरने केलेल्या संशोधनातून जाहीर केले आहे. त्यामुळे दुधाचा चहा पिण्याचे टाळावे तसेच चहा व कॉफीचे सेवन कधी करावे याबाबत आयसीएमआरन काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय पोषण संस्थेने (एनआयएन) केलेल्या संशोधनामध्ये कॅफिनयुक्त पेयांमध्ये असलेले टॅनिन शरीरात लोह शोषण्यास अडथळा आणू शकतात. टॅनिन पोटातील लोहासाठी प्रतिरोधक असतात. ज्यामुळे शरीरामध्ये लोहाची कमतरता आणि अशक्तपणा सारखी परिस्थिती उद्भवते. याव्यतिरिक्त, कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या अनियमिततेस कारणीभूत ठरते. ब्रूड कॉफीच्या १५० मिलीमध्ये ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफिन असते, तर इन्स्टंट कॉफीमध्ये ५० ते ६५ मिलीग्रॅम इतके कॅफिन असते. त्याचप्रमाणे, चहामध्ये ३० ते ६५ मिलीग्रॅम कॅफिन असते. यावरून कॅफिनचे सेवन जास्त प्रमाणात करणे घातक असल्याचे दिसून येते. चहा आणि कॉफीमधील कॅफीन आपल्या शरीराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबित्वाकडे नेत असते, असे सांगून त्यांनी जास्त प्रमाणात सेवन करण्यापासून सावध केले.
१७ नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी
आयसीएमआरने एनआयएनच्या माध्यमातून देशभरात निरोगी खाण्याच्या सवयींना प्राेत्साहन देण्यासााठी १७ नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्त्वांमध्ये चहा आणि कॉफीच्या जास्त प्रमाणात सेवन करण्याबाबत नागरिकांना सावध राहण्याची शिफारस केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधून वैविध्यपूर्ण आहार आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले आहे. एखाद्याने जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेये घेणे टाळावे. जेवणापूर्वी आणि नंतर किमान एक तास चहा पिणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय संस्थेने दिला आहे. चहासारखे पेय पदार्थ आहारातील लोहाला प्रतिबंध करतात, त्यामुळे ते उपलब्ध होण्यापासून रोखले जातात. त्यामुळे आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नागरिकांना दुधाचा चहा टाळण्याचा सल्ला दिला आणि दुधाशिवाय चहा पिण्याचे फायदे अधोरेखित केले. दुधाशिवाय चहा प्यायल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि कोरोनरी धमनी रोग आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे आयसीएमआरने जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.