शिक्षण

एमएचटी सीईटीच्या प्रश्नांवर २३२ विद्यार्थ्यांचे १ हजार ४०० आक्षेप

४७ आक्षेपांमध्ये आढळले तथ्य

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमचटी सीईटीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांवर २३२ विद्यार्थ्यांनी तब्बल १ हजार ४०० आक्षेप नोंदवले आहेत. यातील ४७ आक्षेपांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान एमएचटी सीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांची उत्तर तालिका आणि सोडविलेले प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिद्ध केले होते. प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन प्रति आक्षेप एक हजार रुपये भरून आक्षेप नोंदवण्याचे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले होते. त्यानुसार २३२ विद्यार्थ्यांनी एकूण १ हजार ४२५ आक्षेप नोंदवले. यामध्ये पीसीएम गटामध्ये सर्वाधिक २२७ विद्यार्थ्यांनी १ हजार ४०८ आक्षेप नोंदवले तर, पीसीबी गटामध्ये ५ विद्यार्थ्यांनी १५ आक्षेप नोंदवले. नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी सर्वाधिक आक्षेप हे गणित (६८६) विषयातील प्रश्नांवर नोंदवण्यात आले. त्याखालोखाल भौतिकशास्त्र (४३९), रसायनशास्त्र (२८९) आणि जीवशास्त्र (११) इतके नोंदवण्यात आले आहेत. या आक्षेपांची सीईटी कक्षाच्या तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीमध्ये ४७ प्रश्नांवरील आक्षेपामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. यामध्ये भौतिकशास्त्र १८, गणित १७, रसायनशास्त्र ९ आणि जीवशास्त्र ३ इतक्या प्रश्नांमध्ये तथ्य आढळून आले आहे. चुकीचे उत्तर असलेल्या प्रश्नांची यादी सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहीर केलल्या यादीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या परीक्षेचे ३० सत्र घेण्यात आले होते. या ३० सत्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचे ५ हजार १०० प्रश्न निवडण्यात आले होते. यातील ४७ प्रश्नांवरील आक्षेपांमध्ये तथ्य आढळून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *