मुंबई :
मेंदूतील ट्युमरच्या गंभीर शस्त्रकियेसाठी टाटा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड यंत्र आणण्यात आले आहे. मेंदूतील ट्यूमर सुरक्षितपणे आणि अचूकपणे काढून टाकण्यासाठी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग महत्त्वपूर्ण असून, ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. टाटा रुग्णालयातील मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. अलीअसगर मोईयादी यांच्या नेतृत्वाखाली इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड प्रणालीतील बीकेॲक्टिव्ह हे यंत्र खरेदी करण्यात आले असून, देशात या प्रगत प्रणालीचे हे पहिलेच यंत्र आहे. जगभरातील सर्वात मोठ्या ॲप्लिकेशनपैकी एक आहे.
टाटा रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे, मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. अलीअसगर मोइयादी आणि विप्रो जीई हेल्थकेअरचे दक्षिण एशियाचे व्यवस्थापकीय संचालक चैतन्य सरवटे आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रणालीचे अनावरण करण्यात आले. मेंदूतील ट्यूमर सुरक्षितपणे आणि अचूकपणे काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियादरम्यान इमेजिंग महत्त्वपूर्ण आहे. नेव्हिगेशनसह ब्रेन मॅपिंग तंत्रासोबत हे जोडलेले असल्याने न्यूरोसर्जनना ट्यूमरच्या अवशेषांचा अचूकपणे मागोवा घेण्यास मदत करते. त्यामुळे शस्त्रक्रियागृहात डाक्टरांसाठी हे यंत्र एक सहायक बनू शकते. अन्य इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग सिस्टीमच्या तुलनेत हे कमी खर्चिक आहे. तसेच डॉक्टरांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करण्यासाठी, शस्त्रक्रियेची आवश्यक कौशल्ये अवगत करण्यासाठी हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे. अधिकाधिक डाॅक्टर या तंत्राचा वापर करावेत आणि रुग्णांना त्याचा लाभ व्हावा यसाठी भारतातील डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत. हे यंत्र अनुदानातून खरेदी केले असून यामुळे देशातील कर्कराेग रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळणे शक्य होणार असल्याचे डॉ. अलीअसगर मोईयादी यांनी सांगितले.
मानवी शरीराच्या आतील अवयव स्पष्टपणे दिसावेत व डॉक्टरांना अभ्यास आणि मार्गदर्शन करणे सोपे व्हावे यासाठी अत्याधुनिक इमेजिंग यंत्र तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बीकेॲक्टिवकह अल्ट्रासाऊंड प्रणाली ही शस्त्रक्रियादरम्यान अधिक अचूक, उच्च व स्पष्ट चित्र आणि मेंदूच्या संरचना दाखविण्यासाठी सक्षम असल्याने शस्त्रक्रिया अधिक प्रभावीरित्या करण्यास मदत करते, असे विप्रो जीई हेल्थकेअरचे दक्षिण एशियाचे व्यवस्थापकीय संचालक चैतन्य सरवटे यांनी सांगितले.
संस्थेवर खर्चाचा बोजा न पडता रुग्णांचे अत्याधुनिक उपचार मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया कक्षात प्रगत पण किफायतशीर तंत्रज्ञान आणण्यावर भर दिला,असल्याचे टाटा रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले.