मुंबई :
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी आज शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज कोकण भवन बेलापूर येथे दाखल केला. यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार कपिल पाटील, जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नीरज हातेकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, महाविद्यालयीन शिक्षकांच्या नेत्या
ताप्ती मुखोपाध्याय, मधू परांजपे हे मान्यवर उपस्थित होते.
पेन्शनच्या लढाईत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे सुभाष सावित्री किसन मोरे हे शिक्षक कार्यकर्ते असून, चेंबूरच्या अमरनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत. शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून विविध शैक्षणिक व सामजिक आंदोलनात ते सहभागी आहेत. शिक्षक भारतीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षकांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने त्यांची निवड झाली आहे. सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सुभाष मोरे आमच्या शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष असून आमची संघटना सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारी आहे. सुभाष मोरे यांनी त्यांच्या नावात स्वतःच्या आईचे नाव लावले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबईतील सर्व शिक्षक मुंबई शिक्षक मतदार संघातून सुभाष सावित्री किसन मोरे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी काम करणार, असे शिक्षक भारती संघटनेच्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी व्यक्त केले.
माझी उमेदवारी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून कंत्राटीकरण आणि खाजगीकरण यांच्या विरोधात आहे. शाळा कॉलेज एडेड असो वा अन एडेड समान काम समान वेतन, समान पेन्शन आणि कॅशलेस आरोग्य योजना मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे.
– सुभाष सावित्री किसन मोरे