आरोग्य

गर्भनिरोधक कुचकामी ठरत असल्याने मुंबईत वाढतेय गर्भपाताचे प्रमाण

मुंबई :

कुटुंबनियोजन करण्यासाठी तरुण-तरुणींकडून साधारणपणे गर्भनिरोधकांचा वापर करण्यात येतो. मात्र हे गर्भनिरोधकच कुचकामी ठरत असल्याने मुंबईमध्ये मागील तीन वर्षांमध्ये गर्भपाताच्या संख्येत वाढ झाली आहे. गर्भनिरोधत कुचकामी ठरल्याने मागील तीन वर्षांमध्ये मुंबईमध्ये ६७ हजार ६३९ महिलांवर गर्भपात करण्याची वेळ आली आहे. यामध्ये ३० ते ३४ वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबईमध्ये मागील तीन वर्षांमध्ये विविध कारणांमुळे ७८ हजार १९९ इतक्या महिलांना गर्भपात केला. यामध्ये सर्वाधिक कारण हे गर्भनिरोधक अयशस्वी ठरणे हे आहे. गर्भनिरोध कुचकामी ठरल्यामुळे ६७ हजार ६३९ महिलांवर या तीन वर्षात गर्भपात करण्याची वेळ आली आहे. यामध्ये २०२२ – २३ मध्ये २३ हजार ७९८ महिलांना गर्भनिरोधक पद्धत अयशस्वी ठरल्याने गर्भपात करावे लागले आहे. तर २०२३- २४ मध्ये २२ हजार १४९ आणि २०२१ – २२ मध्ये २१ हजार ६९२ महिलांनी गर्भपात केल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून उघडकीस आले आहे.

करिअर घडवणे, आर्थिक स्थैर्य व बदलती जीवनशैली यामुळे तरुण व तरुणी लग्न करण्यास विलंब करतात. त्यातूनच लवकर लग्न झाल्यास पहिले अपत्य लवकर होऊ नये यासाठी त्यांच्याकडून विविध गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरते. तर कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या व इंजेक्शन यांचे अयशस्वी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. गर्भनिरोधक पद्धत अपयशी ठरत असल्याने नको असलेल्या गर्भधारणेला महिलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांकडून सांगण्यात येते.

गर्भनिरोधक पद्धती कोणत्या

  • नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
  • कंडोम
  • गर्भनिरोधक गोळ्या
  • गर्भनिरोधक इंजेक्शन

आपल्या वयोमानाप्रमाणे, अपत्यांप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर गर्भनिरोधक वापरले तर नको असलेली गर्भधारणा राहण्याचे प्रमाण कमी होईल आणि गर्भपाताचे प्रमाणही कमी होईल.
– डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय

करिअरच्या नादामध्ये विवाहित जोडप्यांना लवकर मुले नको असतात. परंतु पहिल्या गर्भधारणेवेळी शक्यतो गर्भपात करू नये. असे केल्यास महिलेला समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
– डॉ. राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ, सेंट जॉर्जेस रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *