मुंबई :
वधू-वराचं ‘शुभमंगल’ होण्यासाठी संकेतस्थळाचा विचार करत असाल तर आधीच ‘सावधान’ असलेलं बरं. सध्याच्या युगात आपण सगळेच ऑनलाईनच्या प्रेमात पडलेलो आहोत. लग्न जुळवण्यासाठी अलीकडे अनेक संकेतस्थळ कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक संकेतस्थळं ही बनावट असल्याचे समोर आले आहे. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर मुला-मुलींची सविस्तर माहिती दिली जाते. या माहितीचा दुरूपयोग केला जात असल्याचेही समोर आले आहे.
लग्नाच्या गाठी स्वर्गात जमतात असं म्हटलं जातं. पारंपरिक पध्दतीने अनेक विवाहसंस्था आणि मंडळं यासाठी कार्यरत आहेत. मात्र, सध्याच्या माहितीजाल युगात याला पर्याय म्हणून ऑनलाईन संकेतस्थळ अस्तित्वात आली आहे. पण सध्याच्या टेक्नोयुगात यासाठी अनेक संकेतस्थळ अस्तित्वात आली आहेत. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एका पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी येथून ‘नप्चल्स’ (nuptials) या नावाने अश्विनी पाटील नावाची महिला ऑनलाईन विवाह जुळवणारे संकेतस्थळ चालवतात. त्या पालकांनी या संकेतस्थळावर पैसे भरून त्यांच्या मुलीचे नाव नोंदवले. त्यानंतर काही इच्छुक स्थळांची माहिती आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आले. संबंधित पालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर इच्छुक स्थळांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर समोरील व्यक्तींनी त्या ठिकाणी विवाहासाठी कोणतीही नावनोंदणी केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खातरजमा करण्यासाठी त्या पालकांनी अन्य काही स्थळांची माहिती मागवून घेतली असता त्यांना तोच प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती हाच अनुभव अन्य पालकांनाही आल्याचे लक्षात आले आहे. नागपूर आणि मुंबईतून रिया जाधव नावाच्या महिलेचे ‘विवाहसंस्था’ (vivahsanstha) या नावाचे संकेतस्थळ सुरू असून त्यातही असाच अनुभव वधू-वराच्या आईवडिलांना आल्याचे स्पष्ट झाले.
आपल्याच लोकांना बोलायला सांगायचे
बनावट संकेतस्थळ चालवणारी ही मंडळी काही मान्यवर विवाह संस्थांकडून मुलामुलींचे प्रोफाईल कॉपी करून घेतात. आपल्याच काही लोकांना फोनवर बोलायला सांगून इच्छुक स्थळांची माहिती गोळा करतात असे दिसून येतंय. यात मान्यवर विवाह संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही लोकांकडून वधू-वरांची सविस्तर माहिती चोरली जात असावी, अशा पध्दतीने काम कऱण्याऱ्यांची टोळी कार्यरत असावी. ते मिळून काही इच्छुक मुला-मुलींची सविस्तर माहिती एकमेकांना पुरवत असावेत, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पालकांनी अशा संकेतस्थळांपासून सावध राहावे, असे आवाहन बनावट संकेतस्थळांना बळी पडलेल्या पालकांनी केले आहे.
अनेक संकेतस्थळांवर होतेय केवळ चॅटिंग
विवाह जुळवणाऱ्या अनेक संकेतस्थळांवर मुलामुलींना आपला योग्य साथीदार निवडण्यापूर्वी एकमेकांशी बोलण्याची मुभा दिली जाते. इच्छुकांच्या आई-वडिलांनादेखील आपल्या पाल्याने योग्य जोडीदार निवडावा असे वाटत असते. मात्र अशा अनेक नवनव्या संकेतस्थळांवर असलेली विशेषतः मुलं केवळ टाईमपास करण्यासाठी चॅटिंग करत असल्याचे आढळून आले आहे. या मुला-मुलींची संकेतस्थळांवर असलेली माहिती आणि त्यांची प्रत्यक्षात असेलली नावे आणि माहिती यात तफावत असल्याचे आढळले आहे.