शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

१६ जून रोजी प्रवेश परीक्षा

मुंबई : 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी (NCNNUM) केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या एम.एस्सी. या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी केंद्रातील अत्याधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा असलेले विद्यापीठातील एक प्रमुख संशोधन केंद्र म्हणून या विभागाची ख्याती आहे. विद्यार्थ्यांना नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीबाबत सर्वसमावेशक समज तयार व्हावी, या उद्योन्मुख आणि अत्याधुनिक क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन आणि त्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्रात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत मायक्रोस्कोपी (SEM, TEM, AFM, SPM), क्ष-किरण विवर्तन, विद्युत चालकता आणि चुंबकीय मोजमाप अशा अनुषंगिक अत्याधुनिक सुविधांच्या सहाय्याने अध्ययन आणि संशोधन करण्याची संधी मिळू शकेल. तसेच केंद्रातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, भौतिक विज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि बायोकेमिस्ट्री यांसारख्या विविध क्षेत्रांतील संशोधनालाही सहाय्य ठरणार आहे. बहुविद्याशाखीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये विविध संस्थामध्ये इंटर्नशिप, कार्यशाळा आणि औद्योगिक सहकार्यांद्वारे अनुभवाधारीत शिक्षण घेण्याची संधी या केंद्राद्वारे प्रदान केली जाते. या केंद्रातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या, संशोधन संस्था आणि विद्यापीठात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ऑन जॉब ट्रेनिंगसाठी या केंद्रामार्फत एक्सेल इन्स्ट्रुमेंट, आदित्य बिर्ला सायन्स अँड टेक्नॉलॉजी कं. यासह ओरलिकॉन बाल्झर्स कोटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सरफेस मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, अँट्स सिरॅमिक्स लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, आणि दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड अशा नामांकित कंपन्यांमध्ये कार्यांतर्गत प्रशिक्षणाची संधी मिळू शकणार असल्याचे या केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रीया आणि प्रवेश परीक्षेसाठी https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर त्याचबरोबर https://forms.gle/QbMMx51iCgPG65uN8 या गुगल फॉर्मवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य असेल, नोंदणीसाठी १५ जून २०२४ ही अंतिम तारीख आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *