
मुंबई :
कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने मुख, स्तन आणि मानेसंबंधी कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये पावसाळ्यानंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये आरोग्य कुटुंबम कार्यक्रमाची घोषणा केली होती. हा कार्यक्रम अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये कर्करोग नियंत्रण मॉडेलची घोषणा केली आहे. या मॉडेलअंतर्गत कर्करोग रुग्णांचा जलद गतीने शोध घेऊन त्यांच्यावर वेळवर उपाय करणे शक्य होणार आहे. मुंबईमध्ये सध्या २३९ आपला दवाखाना कार्यरत असून, यामध्ये टप्प्याटप्याने ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. आपला दवाखान्यामध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनीही दुजोरा दिला आहे. रुग्ण तपासणीमध्ये मुख, स्तन आणि मानेसंबंधी कर्करोगाचे गंभीर रुग्ण आढळल्यास त्यांना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालय व उपनगरीय रुग्णालयामध्ये संदर्भित करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या स्टेप सर्वे २०२१ नुसार मुंबईमध्ये १३ टक्के नागरिक हे तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांमध्ये सर्वाधिक होणाऱ्या कर्करोगामध्ये मानेसंबंधीचा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे स्तन कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. २५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यातील ६० टक्के महिलांमध्ये कर्करोगाचे निदान अखेरच्या टप्प्यात होत आहे. वेळेवर निदान झाल्यास ९८ टक्के प्रकरणांमध्ये प्राण वाचण्याची शक्यता आहे.