मुंबई :
राज्यात इन्फ्लूएंजा रुग्णांच्या संख्येत मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या रुग्णांची सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये चाचणी करण्याची सुविधा आहे. मात्र राज्यातील विविध शहरातील खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीच्या दरामध्ये खूप तफावत आहे. खाजगी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या इन्फ्लुएंझा चाचणी दरावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने, राज्यातील विविध खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रूग्णालयांमध्ये इन्फ्लुएंझा चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने २००९ पासून इन्फ्लुएंझा ए (एच१ एन१) ही महामारी म्हणून घोषित केली आहे. राज्यात दरवर्षी इन्फ्लुएंझा ए (एच१ एन१) रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये राज्यात इन्फ्लुएंझाची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. जानेवारी २०२३ पासून इन्फ्लुएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सध्या राज्यात ४१ हून अधिक सरकारी प्रयोगशाळांमध्ये इन्फ्लुएंझा चाचणी मोफत केली जाते. मात्र, इन्फ्लुएंझाच्या संशयित रुग्णांची खाजगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात आहे. राज्यातील विविध शहरातील विविध खाजगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या चाचण्यांच्या दरामध्ये खूप तफावत आहे. त्यामुळे रुग्णांची आर्थिक फसणूक होऊन त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्यात इन्फ्लुएंझा ए (एच१ एन१) या आजाराच्या उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणी करणे तसेच विविध खाजगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये इन्फ्लुएंझा चाचणीच्या विविध दरांमधील तफावत दूर करून, इन्फ्लुएंझा चाचणीचे दर निश्चित करून चाचणी दराची मर्यादा ठरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची वर्षातून किमान एकदा बैठक घेण्यात येणार आहे.
समितीमध्ये नियुक्त सदस्य
या समितीमध्ये सह अध्यक्षपदी पुणे येथील आरोग्य सेवा संचालक आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्यपदी राष्ट्रीय विषाणू संस्थान, इंडियन मेडिकल असोसिएशन, इन्फ्लूएंजा करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांचे प्रतिनिधी, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, जे. जे. रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख, त्याचप्रमाणे पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोलचे सहसंचालक यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.