मुंबई :
बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २९ जूनपासून नोंदणी प्रक्रिय सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी झालेली परीक्षा देणे शक्य झाले नाही अशा विद्यार्थ्यांना एक संधी मिळणार आहे. तसेच यापूर्वी २९ मे रोजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात आली होती. ही परीक्षा ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यामुळे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा प्रथमच सीईटी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला व्यक्तीश: भेट देऊन, मेलद्वारे, दूरध्वनीद्वारे तसेच अर्जाद्वारे अतिरिक्त परीक्षा घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमाची अतिरिक्त सीईटी घेण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अतिरिक्त सीईटीसाठी नोंदणी करण्यास २९ जूनपासून सुरूवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
कोण देऊ शकतो परीक्षा
२९ मे रोजी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. अशा उमेदवारांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वात्तम असणारे पसेंटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेवेळी उमेदवारांनी सर्वोत्तम पसेंटाईलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक राहील.अतिरिक्त परीक्षेची निकाल प्रक्रिया देखील पसेंटाईल पद्धतीने करण्यात येईल.
सीईटीचा निकाल जाहीर
बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी कक्षातर्फे २९ मे २०२४ रोजी विविध ११५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तो त्यांच्या लॉग इन आयडीवर पाहता येईल. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत.