शहर

डोगरावर अडकलेल्या पाच मुलांची सात तासांनी सुखरूप सुटका

ठाणे :

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या परंतु परतीचा मार्ग विसरल्यामुळे डोगरावरील जंगलामध्ये अडकलेल्या पाच अल्पवयीन मुलांची विविध पथकांनी मिळून सात तासांनी सुखरुप सुटका केली. विविध पथकांनी मिळून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मुंब्य्रातील रहाणारा असहदूल शेख (वय१२), मोहम्मद पिंटू शेख (वय ११), मुन्ना शेख (वय ९) सर्व रहाणार दर्गा गल्ली, अमृत नगर तसेच ईशान शेख (वय १०, रा.आझाद नगर) आणि अमीर शेख (वय ११, रा. कौसा) ही पाच मुले शुक्रवारी संध्याकाळी बायपास रस्त्याजवळील खडी मशीन परीसरातील ३०० फूट उंच डोगरावर खेकडे पकडण्यासाठी गेली होती. परंतु ते परतीचा मार्ग विसरल्याने तेथे अडकले. याबाबतची माहिती रात्री ८ वाजून २० मिनिटांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मुंब्रा अग्निशमन दलामार्फत मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी वाय. एम. तडवी, मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी हेमंत दिव, गणेश खेताडे, माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण, ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीन खान, अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यावस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे (टीडीआरएफ) तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सुशांत शेटी, स्थानिक पोलिस आणि गिर्यारोहक योगेश सद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोगरावरील निसरडा भाग, पाऊस, दाट अंधार या सर्व कठीण परिस्थितीवर मात करुन अथक प्रयत्नानी सर्व पथकांनी संयुक्त प्रयत्न करुन शनिवारी मध्यरात्री तीन वाजता मुलांची सुखरुप सुटका करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दरम्यान त्यांना कुणीतरी एका व्यक्तीने खेकडे पकडण्यासाठी तेथे नेले होते, अशी माहिती मुलांनी पोलिसांना दिल्याची माहिती खेताडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *