क्रीडा

कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा : कोल्हापूर, पुणे व सांगलीचे वर्चस्व; धाराशिव, मुंबई उपनगरचीही अंतिम फेरीत धडक

इचलकरंजी :

कै. भाई नेरुरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत अंतिम टप्प्यावर पोहोचताना कोल्हापूर, पुणे आणि सांगलीच्या प्रत्येकी दोन संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. यासोबतच धाराशिवच्या महिला संघाने आणि मुंबई उपनगरच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. २१च्या मैदानावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपांत्य फेरीत झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये खेळाडूंच्या अप्रतिम कौशल्याचे दर्शन घडले.

थरारक उपांत्य फेरीचे सामने

पुरुष गट : मुंबई उपनगरने सांगलीचा १७-१६ असा निसटता विजय मिळवला. अक्षय भांगरे (१.३०, १.५० मि. संरक्षण, १ गुण), दीपक माधव (१.४० मि., ४ गुण) आणि अनिकेत पोटे (१.२० मि., ४ गुण) यांनी संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. सांगलीच्या ओंकार पाटील (१.३० नाबाद, ६ गुण) आणि सौरभ घाडगे (१.३० मि., ४ गुण) यांच्या जोरदार प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने पुण्याला २२-१८ असे पराभूत केले. कोल्हापूरच्या श्रीराम कांबळे (१.१० मि., २ गुण), सौरभ आडावकर (५ गुण) आणि शरद घाटगे (४ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महिला गट : महिला गटातील उपांत्य सामन्यात मध्यंतरापर्यंत ७-७ असे बरोबरीत रोखलेल्या धाराशिवने कोल्हापूरला १२-१० असे २ गुण आणि ३.१० मिनिटे राखून नमविले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्यंतराच्या ६-८ अशा पिछाडीवरून पुण्याने ठाण्यावर १६-१२ असा ४ गुणांनी विजय मिळविला. पुण्याच्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने (२.१०, २.३० मिनिटे संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. तिला दिपाली राठोड (२.२० मिनिटे व ४ गुण) व भाग्यश्री बडे ( १.१०, १.४० मिनिटे व एक गुण) यांनी साथ दिली. ठाण्याच्या रेश्मा राठोड (२.२०, २ मिनिटे), दीक्षा सोनुरकर (१.३०, १.३० मिनिटे व ३ गुण) व गीतांजली नरसाळे (२.१० मि. संरक्षण) यांनी चांगली लढत दिली.

किशोर गट : कोल्हापूरने धाराशिवचा १५-१४ असा रोमांचक पराभव केला. देवराज यड्रावे (१.४०, २.०० मि. संरक्षण, १ गुण), रुद्र यादव (२.५० मि., २ गुण) आणि ओजस बंडगर (६ गुण) यांनी शानदार खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगलीने साताऱ्याला २०-१६ असे नमवले. सांगलीच्या सार्थक हिरेकुर्ब (२.५० मि., ४ गडी), आदर्श सरगर (१.१० मि., ३ गडी) आणि दक्ष जाधव (१.१० मि., ४ गुण) यांनी अप्रतिम खेळ करत अंतिम फेरी गाठली.

किशोरी गट : सांगलीने ठाण्याला १४-८ अशा ६ गुणांनी सहज हरवले. सांगलीच्या श्रावणी तामखडे (३.००, १.०० मि.), अनुष्का तामखडे (१.४०, २.४० मि., ७ गडी) आणि वेदिका तामखडे (१.००, २.०० मि.) यांनी उत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने धाराशिवला १२-१० असा पराभव देत अंतिम फेरी गाठली. पुण्याच्या अपर्णा वर्धे (२.००, १.१० मि. संरक्षण, ४ गडी बाद), आराध्या गीते (१.४० मि., २ गडी बाद) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अंतिम फेरीची होणाऱ्या रंगतदार लढती

  • पुरुष गट : कोल्हापूर वि. मुंबई उपनगर
  • महिला गट : धाराशिव वि. पुणे
  • किशोर गट : कोल्हापूर वि. सांगली
  • किशोरी गट : सांगली वि. पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *