मुंबई :
प्रतिस्पर्धी संजय पाटील यांच्या गुंडांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याला गोवंडी, मानखुर्द येथे भव्य प्रचार यात्रा काढून ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी चोख प्रत्युत्तर दिले. अशा भेकड हल्ल्याना महायुतीचे कार्यकर्ते भीक घालत नाहीत. पराभव दिसू लागल्यानेच संजय पाटील, असे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. महायुतीचे कार्यकर्ते ना थांबणार, ना घाबरणार, ते तितक्याच ताकदीने आणि जोशात प्रचार करणार, असा विश्वास मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला.
मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर सोमवारी सायंकाळी गोवांडीच्या न्यू गौतम नगर, सोनापूर भागात दगडफेक झाली. त्यात भाजप सचिव निहारीका खोंदले यांच्यासह दोघे जखमी झाले. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मिहीर कोटेचा यांनी प्रतिस्पर्धी संजय पाटील यांना बुधवारी गोवंडीच्या त्याच भागात प्रचार करेन, हिंमत असेल तर छातीवर वार कर, पाठीवर नको, असे खुले आव्हान दिले होते.
दिल्या शब्दाप्रमणे मिहीर कोटेचा दुपारी बाराच्या सुमारास गोवंडीच्या शंकरा कॉलनी येथे पोहोचले. ते तेथे येण्याआधीच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सुमारे एक हजार कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मिहीर कोटेचा यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी, त्यांना पाठींबा देण्यासाठी जमले होते. मिहीर कोटेचा यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर सुरू झाला. मिहीर भाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है…क्यू फस रहे हो चक्कर मे, कोई नहीं है टक्कर मे..अब की बार चारसो पार…ही घोषणाबाजी टिपेला गेली. शहिद अशोक कामटे उद्यानासमोरील सर्व सोसायट्यांमध्ये मिहीर कोटेचा यांचे औक्षण करण्यात आले. गोडधोड भरवून रहिवाशांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही सोबत आहोत, आम्हाला गुंडगिरी नकोय, आम्हाला विकास हवाय. पंतप्रधान मोदींवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे सांगत रहिवाशांनी मिहीर कोटेचा यांना आश्वस्त केले.
सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत आत्मविश्वासाने मिहीर कोटेचा भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया यांच्या समवेत प्रचार रथावर आरूढ झाले. जय श्री राम, जय श्री राम… म्हणत दीडेक हजार महायुतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मिहीर कोटेचा अत्यंत दिमाखात गोवंडीच्या गौतम नगर परिसरात दाखल झाले. वाटेतील बेकऱ्या, वखारी, लोखंड समान विकाणारे अर्थात एकूणच व्यापारी वर्ग, आसपासच्या चाळी, म्हाडाच्या बहुमजली इमारतींमधील रहिवासी मिहीर कोटेचा यांना पाहण्यासाठी, त्यांची प्रचार फेरी अनुभवण्यासाठी रस्त्यावर उतरली. त्या सर्वांच्या शुभेच्छा हात जोडून, स्मित करत कोटेचा यांनी आपल्याशा करून घेतल्या.
करबला मशिदी समोरील उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिहीर कोटेचा यांनी आशिर्वाद घेतले. तेथून संपूर्ण गौतम नगरात मिहीर कोटेचा यांनी पदयात्रा काढली. त्यांना पाहण्यासाठी गौतम नगरातील चिंचोळ्या रस्त्यावर दुतर्फा तोबा गर्दी जमली होती. येथील शिवसेना शाखेजवळ आपले मनोगत व्यक्त करून मिहीर कोटेचा यांनी बुधवारच्या पहिल्या सत्रातील प्रचाराची सांगता केली.
श्रीनगरच्या लालचौकात झेंडा फडकावला, मानखुर्द तर मुंबईतच आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गंगा मानखुर्द – शिवाजी नगरमध्ये घराघरात पोचली आहे. त्यामुळे इथले गोरगरीब, श्रमिक आपल्या पासून तुटतील या भीतीपोटी प्रतिस्पर्धी संजय पाटील आपल्या गुंडां करवी, असे हल्ले घडवून आणत आहेत. अशा प्रकारांमुळे महायुतीचे कार्यकर्ते घाबरतील, प्रचार करणार नाहीत हा त्यांचा गैरसमज आहे. उलट महायुतीचे कार्यकर्ते अशा प्रकारांना भीक न घालता आणखी जोशाने, ताकदीने प्रचार करतील. काश्मीरमध्ये जाऊन श्रीनगरच्या लाल चौकात झेंडा फडकावून येऊ शकतो तर मानखुर्द हा मुंबई, महाराष्ट्राचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केली.
मानखुर्द मधील कुटुंबांना मोदींच्या योजनांचा लाभ
मानखुर्दमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गंगा घरोघरी पोचली आहे. मानखुर्द मध्ये कोणत्याही धरणाचे गरीब असतील त्यांना आजही मोफत शिधा उपलब्ध होत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत इथल्या सुमारे ३० हजार कुटुंबांना आयुषमान कार्ड मिळाले आहे. मोदींची विकासाची गंगा जात धर्म असा भेदभाव करत नाही, असा दावा कोटेचा यांनी येथे केला.