मुंबई :
राज्यामध्ये भंडारा येथे उष्माघाताने मंगळवारी एकाच मृत्यू झाला असून, नागपूरमध्ये तिघांचा संशयित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये आतापर्यंत उष्माघाताचे २८१ रुग्ण आढळले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील भास्कर तरारे हे २८ मे रोजी म्हशी चरावयास घेऊन गेले होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे भास्कर तरारे यांचा उष्माघाताचा संशयित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तरारे यांचा ३१ मे रोजी आलेल्या मृत्यू परीक्षण अहवालानुसार त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये उष्माघाताच्या पहिला मृत्यू नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये तीन जणांचा उष्माघाताने संशयित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या तिघांच्या मृत्यूसंदर्भातील मृत्यू परीक्षण अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यामध्ये उष्माघाताने १० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यामध्ये उष्माघाताचे आतापर्यंत २८१ रुग्ण सापडले असून, सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये २९ सापडले आहेत. त्याखालोखाल जालनामध्ये २८, भंडाऱ्यामध्ये २३, धुळ्यामध्ये २०, सोलापूरमध्ये १९ तसेच नागपूर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी १७ रुग्ण सापडले आहेत.
मुंबईमध्ये तीन रुग्णांची नोंद
वाढत्या उकाड्याने मुंबईतील नागरिक हैराण होत आहेत. मात्र मार्चपासून अद्यापपर्यंत मुंबईमध्ये उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र मे अखेरीस मुंबईमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे.