मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यामध्ये १७ विद्यार्थी हे पीसीबी गटातील तर २० विद्यार्थी हे पीसीएम गटातील आहेत.
पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेला यंदा ७ लाख २५ हजार ०५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी पीसीबी गटातून तर पीसीएम या गटातून २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. १५९ केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील १६ परीक्षा केंद्र हे महाराष्ट्राबाहेर होते. एमएचटी सीईटीच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यामध्ये १७ विद्यार्थी हे पीसीबी गटातील तर २० विद्यार्थी हे पीसीएम गटातील आहेत.
खुल्या वर्गामध्ये १०० पर्सेंटाईल गुण हे १८ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, तर ओबीसी प्रवर्गात आठ, एनटी ३ मध्ये दोन आणि एनटी २ प्रवर्गात एका विद्यार्थ्यांला १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गात टॉप १० मध्ये काेल्हापूर, ठाणे आणि मुंबईचा वरचष्मा दिसून आला. पहिला व दुसरा क्रमांक कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी पटकावला, तर तिसरा व चौथा क्रमांक मुंबईतील विद्यार्थ्यांनी पटकावला. टॉप १० मध्ये काेल्हापूर व ठाण्यातील प्रत्येकी तीन विद्यार्थी, मुंबईतील दोन नागपूर व पुण्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी आहे.