मुंबई :
शीव रुग्णालयाने गरजू व विविध आजारग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कर्करोग, थॕलेसेमिया, बोनमॕरो प्रत्यारोपण यासारख्या आजाराने ग्रस्त विद्यार्थी आणि गरीब रूग्णांची मुले अशा २५० विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेपयोगी साहित्याचे वाटप केले. त्याचप्रमाणे पाच वर्षाहून अधिक काळ कर्करोगाचा सक्षमपणे मुकाबला करणार्या रूग्णांचा गौरव शीव रुग्णालयाकडून करण्यात आला.
शीव रुग्णालय व लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाने एकत्रितरित्या गरीब, गरजू रुग्णांच्या मुलांबरोबरच विविध आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लिखाणाचे साहित्य, कंपास पेटी अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ताने मदत केल्याने शालेय वर्षाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना एक चांगला मदतीचा हात देणे शक्य झाले. त्याचप्रमाणे कर्करोगाचा सक्षमपणे आणि सातत्याने पाच वर्षाहून अधिक कालावधीसाठी मुकाबला करणार्या रुग्णांचा सुद्धा शीव रुग्णालयाकडून गौरव करण्यात आला. या रुग्णांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ केमोथेरपी घेत कर्करोगाविरूद्ध लढा कायम ठेवला आहे. कर्करोगाचा सक्षमपणे मुकाबला करणाऱ्या या रुग्णांना उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना पाच लाखांची करणार मदत
शीव रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ सायनच्या माध्यमातून २७ जून २०२४ रोजी गरजू व मागास प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्यांना ५ लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिक्षकाच्या मुलीकडून ही मदत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ही मदत योग्य वेळेत मिळावी यासाठी समाजविकास अधिकारी स्मिता नगारे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अथकपणे मेहनत घेतली आहे.