मुंबई :
एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर एचआयव्ही संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये १ एप्रिल २००४ रोजी पहिले एआरटी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राला २० वर्ष पूर्ण झाली असून, या २० वर्षांमध्ये जे.जे. रुग्णालयामध्ये ४३ हजार ८० रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. सध्या जे.जे. रुग्णालयामध्ये तीन एआरटी केंद्र कार्यरत आहेत.
१ एप्रिल २००४ मध्ये जे.जे. रुग्णालयामध्ये पद्मश्री डॉ. अलका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआरटी केंद्राची सुरूवात करण्यात आली. १४ सप्टेंबर २०१६ रोजी दुसऱ्या एआरटी तर १ डिसेंबर २०१७ ला तिसऱ्या एआरटी केंद्राची सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या एआरटी सुविधेतंर्गत ४३ हजार ०८० रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहे. त्यातील पहिल्या एआरटी केंद्रामध्य ५०९५ तर दुसऱ्या एआरटी केंद्रामध्ये ११९१ आणि तिसऱ्या एआरटी केंद्राच्या माध्यमातून ३७९ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. एचआयव्हीसह जगणाऱ्या रूग्णांना विनामूल्य मिळणाऱ्या या औषधांमुळे दिलासा मिळाला. जेजे रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या या पहिल्या एआरटी केंद्राने वीस वर्ष पूर्ण केली आहेत.
आज वीस वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या विशेष सोहळ्यामध्ये जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, एमडॅक्सचे विजयकुमार करंजकर, नोडल अधिकारी डॉ. प्रिया पाटील, जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, डॉ. धीरुभाई राठोड तसेच मागील काही वर्षापासून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांनी यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
तरीही वर्षाला सहाशे रुग्णांचे आव्हान कायम
वीस वर्षांपूर्वी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या एचआयव्ही असलेल्या मुलांची संख्या मोठी होती. त्यात आता घट झाली आहे. मात्र तरीही प्रत्येक वर्षी रुग्णालयाच्या एआरटी केंद्रामध्ये ६०० रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येतात. विविध पातळ्यांवर एचआयव्ही आजाराचा संसर्ग, त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपचार याबद्दल सातत्याने जनजागृती केली जाते. एचआयव्ही रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर विचार करण्याची गरज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.
नवीन आयुष्याची भेट मिळाली.
एआरटी केंद्राने २० वर्षाची पूर्तता केल्यासंदर्भात सुरु येथील वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. आशा (नाव बदलले आहे) ला एचआयव्हीचा संसर्ग झाला तेव्हा तिच्या कुटुंबाने तिच्या जगण्याची उमेद सोडून दिली होती. त्यावेळी तिची मुलगी चार वर्षाची होती. मुलगी कळती होईपर्यंत तरी हिला जगवा, अशी विनवणी तिच्या पालकांनी केली होती. आशाने एआरटी उपचारपद्धती व्यवस्थित घेतली. एचआयव्हीसह ती मागील चोवीस वर्ष सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहे.