आरोग्य

भांडुप गर्भवती व अर्भक मृत्यू प्रकरण : मुंबई महानगरपालिकेकडून तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत

ही समिती आठवडाभरात त्यांचा अहवाल सादर करणार असून, त्यानंतर संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई :
पूर्व उपनगरातील भांडुप येथील मुंबई महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये टॉर्चच्या साहाय्याने महिलेची प्रसूती केल्यानंतर अर्भकाचा आणि महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने केईएम, शीव, नायर रुग्णालयातील १० तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली आहे. ही समिती आठवडाभरात त्यांचा अहवाल सादर करणार असून, त्यानंतर संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
भांडुप येथील सुषमा स्वराज महापालिकेच्या प्रसूतिगृहात सोमवारी एका मुस्लिम महिलेची प्रसूती सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे या महिलेची प्रसूती टॉर्चच्या प्रकाशावर डॉक्टरांना करावी लागली. मात्र प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकाचा जन्मत:च मृत्यू झाला तर महिलेचे सिझेरियन झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला शीव रुग्णालयात हलविण्यात आले. शीव रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १० तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली आहे. यामध्ये केईएम, शीव व नायर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यविशारद अशा १० तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या प्रकरणाची चौकशी करून आठवडाभरामध्ये त्यांचा अहवाल वरिष्ठांसमोर सादर करतील. या अहवालानुसार पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *