मुंबई :
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या ‘युरोपियन असोसिएशन ऑफ एंडोस्कोपिक सर्जरी २०२४’मध्ये जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी आपला ठसा उमटवला आहे. या परिसंवादामध्ये सर्वोत्कृष्ट शस्त्रक्रियेसाठी दिल्या गेलेल्या नऊ पुरस्कारांपैकी दोन पुरस्कार हे भारताने पटकावले. हे दोन्ही पुरस्कार जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चित्रफितीद्वारे सादर केलेल्या शस्त्रक्रियांना मिळाले आहेत. डॉक्टरांच्या या कामगिरीमुळे जे.जे. रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे.
नेदरलँडमधील मास्ट्रिच येथे जूनमध्ये झालेल्या ‘युरोपियन असोसिएशन ऑफ एंडोस्कोपिक सर्जरी २०२४’ या परिसंवादात जगभरातील तज्ज्ञ डाक्टर सहभागी झाले होते. यामध्ये जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. अर्शद खान, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी, डॉ. सुप्रिया भोंडवे सहभागी झाले होते. डॉक्टरांच्या या तुकडीने या परिषदेत शस्त्रक्रियेशी संबंधित १३ चित्रफिती व पाच पोस्टर सादर केले. या १३ चित्रफितीपैंकी दोन चित्रफितींनी दोन शस्त्रक्रियांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
या शस्त्रक्रियांनी पटकावले पुरस्कार
श्वासोच्छवासासाठी फुफ्फुसातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या पातळ पडद्याची (डायफ्राम) दुर्बीणीद्वारे केलेल्या दुरुस्तीच्या शस्त्रक्रियेसाठी पुरस्कार मिळाला. याला वैद्यकीय भाषेत व्हिडिओ असिस्टेड थोराकोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणतात. या पडद्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यावर फुफ्फुसाची क्षमता कमी होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. टेलीस्कोपिक दुरुस्ती प्रक्रियेद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी एक पुरस्कार देण्यात आला. तसेच शरीराच्या कोणत्याही भागावर शस्त्रक्रिया करताना त्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ओळखण्यासाठी इंडोसायनाईन ग्रीन इंजेक्शन दिले जाते. यामुळे रक्तवाहिन्यांचे आरेखन करून शस्त्रक्रिया करणे सुलभ होते, या शस्त्रक्रियेसाठी दुसरा पुरस्कार देण्यात आला, अशी माहिती डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार पटकावण्याचा जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचा अभिमानास्पद वारसा आहे. यापूर्वीही या विभागाच्या डॉक्टरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून जे.जे. रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय